लोकगीते -1

मराठी साहित्याची दोन मुख्य अंगे म्हणजे -
1)लिखीत साहित्य
2) मौखिक साहित्य

लिखीत साहित्य म्हणजे लेखनाच्या विविध प्रकारांतून वाचनाच्या रूपाने आपल्यासमोर येणारे साहित्य,जसे की-पुस्तके,ग्रंथ,मासिके,नियतकालिके,वृत्तपत्रे इ.
आणि
मौखिक साहित्य म्हणजे मौखिक रूपाने एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित झालेले साहित्य.जसे की-लोककथा, दंतकथा,लोकगीते, दैवतकथा,आख्यायिका इ.
यात लोकगीतांचे दालन अतिशय समृद्ध आहे.पूर्वी सणासमारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या महिला आपल्या भावभावना गाण्यातून व्यक्त करत असत.पण कोणी एकच स्त्री हे गाणे म्हणत नसे तर प्रत्येक महिला आपआपल्या परिने यात भर घालत असे व हे गाणे उत्तरोत्तर रंगत जाई.म्हणूनच लोकसाहित्याचा किंवा लोकगीताचा रचनाकार कुणी एक नसून अनेक असत.
लोकसाहित्यातील लोकगीते हा मोठाच मनोरंजक आणि गतकाळातील लोकांच्या समृद्ध प्रतीभा क्षमतेचा परिचय देणारा भाग आहे.ही लोकगीते अतिशय सुश्राव्य,मनोरंजक आणि प्रसंगी तीतकीच उद्बोधकही आहेत.
या ब्लाॅगच्या माध्यमातून काही लोकगीतांचा आनंद आपण घेणार आहोत.
    आजच्या पहिल्या लेखात असे लोकगीत जे एकाच गीतात सर्व सणांची क्रमाने माहिती सांगते -
               सणांचे गाणे
आखाडमासी एकादशी 2,श्रावणपंचमी कोण्या दिशी साजणे बाई !
या पंचमीची लाही 2,पोळा आला घाई घाई साजणे बाई !
या पोळीयाचं गोंडं 2,गणपतीची वाकडी सोंड साजणे बाई!
गणपतीच्या हाती लाडू 2, महालक्षुमीला धाडू साजणे बाई !
महालक्षुमीची ताटं 2, म्होरं आला पित्तरपाट साजणे बाई!
या पितराची डाळ 2, म्होरं आली घटमाळ साजणे बाई!
या घटायाची माळ 2, दिवाळी आली काळुंकाळ साजणे बाई!
या दिवाळीची पणती 2, संकरात आली नेणती साजणे बाई!
या संक्रातीचं सूगडं 2, बीजबाईनं पाडलं ऊघडं साजणे बाई!
या बीजयाचा ठम2, माही पुनव घेईना दम साजणे बाई  !
माही पुनवंची ओंबी2, शिमग्यासंग खेळं झोंबी साजणे बाई!
या शिमग्याचा रंग2,  पाडवा आला टोलेजंग साजणे बाई!
या पाडव्याची गूढी2, आखिदीनं मारली ऊडी साजणे बाई!
आखिदीची क-हा केळी2, जतरा आली खेळी साजणे बाई!
या जत्रत पानफूल डौना2, आंबरस आला पाहुणा साजणे बाई!
आंबरस जेवून झाले गार2, दारी पावसाची धार साजणे बाई!
दारी पावसाच्या धारा2, कुणबी म्हणती पेरा पेरा साजणे बाई!

असे हे सुंदर लोकगीत.पहिली ओळ दोनदा म्हटली जाते.अतिशय सुरेख चालीवर नागपंचमीच्या सणाला काही खेडेगावांमध्ये हे गाणे अजूनही म्हटले जाते.यानंतरच्या लेखातून अशाच एका मनोरंजक लोकगीताची मेजवानी रसिकांना मिळेल.

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लोकगीते -4

लोकगीते- 3

लोकगीते - 2