लोकगीते -4

                     लोकगीते - 4
       लोकगीतांची गोडी मोठी अवीट असते.साधी बोली भाषा,सुश्राव्य रचना,रचनेत अनेकांचा सहभाग,लयबद्धता,तालबद्धता,गेयता अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेली ही लोकगीते ग्रामीण स्त्रीया एकत्र येवून म्हणू लागल्या की नुसते ऐकत रहावे.मी स्वतःला मोठी भाग्यवान समजते की हे लोकवैभव अनुभवण्याचे भाग्य मला लाभले.इतरांनाही त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी हा लेखनप्रपंच.या लेखातून आणखी काही लोकगीतांची माहिती पाहुया -

                                     काठवटी काना
            'काठवटी काना' हा एक मोठा कौशल्यपूर्ण खेळ. (याला कदाचित वेगळे काही नावही असू शकते) हा खेळ फक्त कुशल महिलाच खेळू शकतात.हा खेळ म्हणजे 'सबके बस की बात नही!'
            मांडी घालून बसायचे.दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे धरायचे आणि थोडे मागे रेलून कंबरेवर भार घेवून गोल गोल फिरायचे.फीरता फीरता गाणे म्हणायचे -
           
     काठवटी काना, काठवटी काना
    म्हशी गेल्या राना,म्हशी गेल्या राना
    म्हशी कधी यायच्या,म्हशी कधी यायच्या
    दूध कधी द्यायच्या,दूध कधी द्यायच्या
    काळ्या पाठीची गाय,काळ्या पाठीची गाय
    दूध देती लय, दूध देती लय
    दुधाची साय,दुधाची साय
     खरडून खाय,खरडून खाय

गाणे पूर्ण होईपर्यंत कंबरेवर भार घेवून भींगरीसारखे गोल गोल फीरत राहणे म्हणजे अशक्य वाटावी इतकी कठीण गोष्ट.पण या काटक स्त्रीया इतक्या सहजपणे आणि भोव-याच्या गतीने गोल गोल फीरतात की नुसते बघत रहावे.अतिशय मनमोहक आणि मंत्रमुग्ध करणारा हा खेडवळ खेळ.प्रत्येक स्त्रीने एकदा तरी या खेडवळ खेळांचा आनंद घ्यायलाच हवा.

                          झिम्मा
या खेळाला हे नाव कसे पडले असावे कुणास ठाऊक पण मोठेच गमतीदार नाव आहे आणि तीतकाच खेळही गमतीदार आहे.
       समोरासमोर दोन महिला उभ्या राहून, चार महिला गोलाकार उभ्या राहून किंवा अनेक महिला गोलाकार उभ्या राहूनही हा खेळ खेळू शकतात.
     पण शक्यतो दोन महिला समोरासमोर उभ्या राहून हा खेळ जास्त प्रभावीपणे आणि वेगात खेळू शकतात.समोरासमोर ऊभे रहायचे.स्वतः एक टाळी वाजवायची आणि पुढची टाळी समोरच्या स्त्रीला द्यायची.अशा टाळ्या देत देत गोल गोल फिरायचे आणि गाणे म्हणायचे --

      आंबा पिकतो,रस गळतो
      कोकणचा राजा बाई,झिम्मा खेळतो
      झिम्मा गेला उडून, पोरी आल्या उठून
     पोरीत पोर नीटाची,नीटाचा काढला मनोरा
      दहा मनी सोनारा,पाय नाही घडीला
      पायांचा जोर ग,सवती मोड ग
      सवती बोलेना,मांडव हालेना
      मांडव सोन्याचा,नवरा वाण्याचा
      हळद लावून पिवळा केला,मारूतीच्या देवळी नेला
      तुमची नवरी पेंगती पेंगती,लाह्या खाया मागती मागती
     जाया खाया सागर सागर,तुमची नवरी पागल पागल
     नवरदेव कोणाचा कोणाचा, एकीचा का दोघींचा
     बाहेर पडल्या चौघींचा, मामंजींच्या लेकीचा लेकीचा
     मामंजींची लेक गोरी,हळद लावा थोडी थोडी
     हळदीचा हुंडा हुंडा,रेशमाचा गोंडा गोंडा

याच खेळाचे आणखी एक गाणे आहे --
       आंबा पीकतो, रस गळतो,
       कोकणचा राजा बाई, झिम्मा खेळतो
       झीम पोरी झीम,कपाळाचं भींग
       भींग गेलं फुटून,पोरी आल्या ऊठून
       पोरीत पोरी,मीच गोरी
      सरसर गोविंदा येतो,मजवरी गुलाल फेकितो
      या या गुलालाचा भाल,आमच्या वेण्या झाल्या लाल
      घडव घडव रे सोनारा,बारीक मोत्यांचा बिजगवरा
      बिजगव-याला खिडक्या,आम्ही दोघी बहिणी लाडक्या
      लाड सांगू बापाला,मोती लावू कापाला
      नदीच्या कडंला,पाय नाय पडंला
      पायातला तोडा,मांडव मोडा
       मांडव कोनाचा,मांडव सोन्याचा
      नवरा कोनाचा,नवरा वान्याचा
      हळद लावून पिवळा केला,
       मारूतीच्या देवळी नेला

अशी अनेक गाणी किंवा लोकगीते ग्रामीण भागात अजुनही सणा समारंभाच्या निमित्ताने म्हटली जातात आणि लोकगीतांची आवड असणा-या माझ्यासारख्या अनेकींना हे लोकगीते गोड आवाजात ऐकण्याचे भाग्य लाभते.



Comments

Popular posts from this blog

लोकगीते- 3

लोकगीते - 2