लोकगीते- 3

                                          दंडफुगडी
   ग्रामीण भागात खेळला जाणारा फुगडीचाच एक प्रकार म्हणजे दंडफुगडी.एकमेकींच्या हातात हात गुंफण्याऐवजी एकमेकींच्या दंडाला धरून फुगडीसारखेच गोल गोल फीरत ही फुगडी खेळली जाते.ही फुगडी खेळताना एक खुप छान गाणे म्हटले जाते -

दंडावरून जाईन ग,पाच पाने खाईन ग
दस-याला बोली केली,दिवाळीला येईन ग!
      दंडफुगडी दंडाची,बाईल माझ्या दिराची
      असा दीर नटुका नटुका,खोब-याचा कटुका कटुका!
असे खोबरे गोड ग गोड ग,जीभेला आला फोड ग फोड ग
फोड काही फुटेना फुटेना,दारचा मामा उठेना उठेना !
     दारच्या मामाच्या हाती,चितरकाठी चितरकाठी
     दैत्य लागला माझ्या पाठी,दैत्य माझा लेक ग लेक ग!
कमळी माझी सून ग,कमळे कमळे दिवा लाव दिवा लाव
दिवा गेला वा-याने वा-याने,कमळी नेली चोराने चोराने!
     चोराच्या हातून सुटली सुटली,बाजेखाली लपली लपली
     सासूबाईंनी देखली देखली,मामंजींनी ठोकली ठोकली!

 अशी एका विशिष्ट चालीत गुंफलेली लोकगीते हे आजही ग्रामीण भागातील स्त्रीयांचे मोठे वैभव आहे. काही हौशी आणि गोड गळ्याच्या स्त्रियांमुळे हे वैभव अजुनही टिकून आहें
                     
                                                कोंबडा
      विशेषतः लहान मुलींचा आवडता असणारा हा खेळ. महिला जेव्हा सणाच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा कुटुंबातील लहान मुलीही त्यांच्यासोबत असत.आपल्या आईला, काकूला,शेजारच्या ताई-माईला असे गाणी म्हणत खेळताना पाहुन त्याही या खेळात सहभागी होतात आणि कोंबडा हा खेळ खेळतात .
     कंबरेत थोडेसे खाली वाकून एका गुडघ्यावर दोन्ही तळहात ठेवून गाणं म्हणत फुगडीसारखेच गोल गोल फीरत गाणे म्हटले जाते-
   
        आक्काबाईचा कोंबडा कोंबडा
        पाटीखाली डालीला डालीला
        पाटी गेली उडून,उडून
        कोंबडा आला चरून चरून
        कोंबड्याच्या गळ्यात साखळी साखळी
        बहीण माझी धाकली धाकली
        सोनाराला इकली इकली
        सोनारदादा नकटा नकटा
        शेंडी धरून आपटा आपटा !
गुणगुणायला अतिशय सहज सोपी आणि अतिशय रसाळ अशी ही लोकगीते आहेत.

                         






Comments

Popular posts from this blog

लोकगीते -4

लोकगीते - 2