लोकगीते - 2
   मागील ब्लाॅगमध्ये आपण सर्व सणांची माहिती सांगणारे एक लोकगीत पाहिले. या लेखात ग्रामीण स्त्रीयांचे काही खेळ व खेळगीते पाहुया.ग्रामीण भागामध्ये सणावाराच्या निमित्ताने अनेक महिला एकत्र येत असत आणि थोड्या वेळाचा विरंगुळा किंवा करमणूक म्हणून फुगडी,दंड फुगडी, झिम्मा,पिंगा,कोंबडा,फेर यासारखे खेळ खेळत असत.या महिला जरी आडाणी -अशिक्षीत असल्या तरी त्यांची प्रतीभाशक्ती मात्र वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक खेळ खेळताना या महिला मोठी गमतीदार गाणी म्हणत असत.गाण्यातून एकमेकींची चेष्टाही करत असत.फुगडी हा या महिलांचा अत्यंत आवडता खेळ.एकमेकींच्या हातात हातात हात गुंफून फुगडी सुरू होते.दोन्ही फुगडी खेळणा-या महिला फुगडीला जोर यावा म्हणून फुगडी सुरू करताना दोन ओळींचे गाणे म्हणतात-   लेप बाई लेप,चंदनाचा लेप  माझ्याबरोबर फुगडी खेळेल ती गुळाची ढेप !   खुर्ची बाई खुर्ची,वेताची खुर्ची  माझ्याबरोबर फुगडी खेळेल ती लवंगी मीरची !   आम्ही दोघी मैत्रीणी जोडीच्या जोडीच्या  हातात पाटल्या तोडीच्या तोडीच्या !   आम्ही दोघी मैत्रीणी वांग्यात ग वांग्यात ग  फोटो काढू टांग्यात ग टांग्यात ग !   कळशी बाई कळशी,चांदीची कळशी  ब...